eDaily
livedinmaan.com
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडून आता पुन्हा खाली बसण्याच्या तयारीत असतानाच सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीने मोठा बॉम्ब टाकून आजच विरोधकांना चारी मुंड्या चित करून टाकले.
शेतकऱ्यांचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि अशोकअण्णा चराटी यांचा पाठिंबा मिळवण्यात महादेवराव महाडीक आणि पी.एन.पाटील या सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीच्या नेत्यांना यश आले आणि वेळ न दवडता आजच माजी खासदार राजू शेट्टी यांना सोबत घेऊन पाठिंबा दिल्याची घोषणा पत्रकार बैठकीत आघाडीच्या नेत्यांनी करून टाकली.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, सावकार मादनाईक, जालिंदर पाटील आदी आघाडीचे नेते उपस्थित होते.
आज झालेल्या पत्रकार परिषदमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपण सत्तारूढ आघाडी बरोबर जात असलेली घोषणा करून विरोधी आघाडीमध्ये मोठा बॉम्ब टाकून दिला. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच रस्त्यावर उतरून लढा देत असते.त्यामुळे संघटनेची ताकद ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आघाडीला फायद्याची ठरणार आहे.
‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारीच माजी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथे भेट घेतली. आणि सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मल्टीस्टेटचा रद्द केलेला ठराव,कोरोना काळात दूध उत्पादकांना झालेली मदत आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. काही अटी शर्तींवर सत्तारूढ गटाला शेट्टी यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आघाडी सोबत राहण्याची तयारी दर्शविली होती.त्यामुळेच याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात झाली.
निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली विरोधी आघाडीची मोट बांधण्यात आली.मात्र या घडामोडी मध्ये शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी कुठेही दिसले नाहीत.राजू शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केलेल्या टिकेनंतर शेट्टी हे ‘गोकुळ’ निवडणुकीत सत्ताधारी आघाडी सोबत राहतील असे मत जाणकारांनी मांडले होते.
Comment: