दिनमान ऑनलाईन डेस्क
कोल्हापूर/
सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले.हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या ज्या विचारधारा विरोधात ते लढले.त्याच विचारधारेने राज्याभिषेकाला विरोध केला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितले ते २१ व्या शतकात आपल्या संविधानात दिसून येते.पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नमस्कार केल्याचे भासवून,चोवीस तासांत संविधान बदलण्यासाठी ती विचारधारा बळावत आहे. त्यामुळे आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नुसते नतमस्तक व्हायचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेसह संविधानाचेही रक्षण करायचे आहे असे आवाहन विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केले.ते कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहू शस्त्रधारी पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की,आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करत आहोत.पण पुतळा असाच उभारला जात नाही. आपण एखादा व्यक्ती,त्यांची विचारधारा आणि त्यांच्या कार्याला मनापासून मानतो तेव्हाच तो उभारला जातो. आम्ही पुतळ्याचे अनावरण केले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्यासाठी आम्ही लढलो नाही तर पुतळ्याला काही अर्थ नाही.जेव्हा आपण छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करतो तेव्हा एक वचनही घेतो,ज्याच्यासाठी ते लढले,त्यांच्या इतके नाही,पण थोडे आपल्यालाही करायला हवे.

जर शिवाजी महाराज,शाहू महाराजांसारखे व्यक्ती नसते तर आज संविधान नसते.याचा अर्थ शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधान यांचे थेट कनेक्शन असल्याचे राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दिले.हिंदुस्थानात आज दोन विचारधारांची लढाई आहे.एक विचारधारा संविधानाचे रक्षण करते. समानता आणि एकतेची गोष्ट करते.ती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे.दुसरी विचारधारा जे संविधान संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते सकाळी उठतात आणि छत्रपती शिवाजी महाराजां -च्या विचारधारेचे संविधान संपवण्याचा विचार सतत करतात.लोकांना धमकावतात,घाबरवतात आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथा टेकतात याला काही अर्थ नाही.

जर आपण शिवाजी महाराजांचे नाव घेतो, त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होता तर आपल्याला संविधानाचे रक्षण करावेच लागेल.हि विचारधारा हजारो वर्षांपासून सुरू आहे.शिवाजी महाराजांच्या काळातही ही याच विरोधात लढाई सुरू होती.याच विचारधारेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही.ही नवीन गोष्ट नाही.हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे.ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात आजही काँग्रेस लढत,शिवशाहुंची विचारधारा मानना-यांनाही यासाठी लढावे लागणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
त्यांची नियत चुकीची म्हणून तर पुतळा कोसळला
मालवण किना-यावर नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांतच कोसळला.यापार्श्वभुमीवर बोलताना, राहुल गांधी यांनी भाजपचा बुरखाच पाडला.नियत कधी लपवू शकत नाही.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला.पण काही महिन्यांनी तो कोसळला.त्यांची नियत चुकीची होती.पुतळ्याने ते संकेत दिले.जर तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असाल तर तुम्हाला त्यांच्या विचारधारेचे रक्षण करावे लागेल.पण त्यांची विचारधारा चुकीची असल्याने तो पुतळा पडला .ते शिवाजी महाराजांसमोर हात जोडतात आणि २४ तासांतच शिवाजी महाराजांच्या विचारांविरोधात काम करतात.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही.नवीन संसद तसेच राम मंदिराच्या उद्घाटनात आदिवासी राष्ट्रपतींना जावू दिले नाही.या विचारधारा एकच आहेत.विचारधारेत फरक नाही.त्यामुळे आपली ही राजकीय लढाई नसून, शिवरायांच्या विचारधारेची संविधानाची लढाई आहे,असेही ते म्हणाले

संविधानात शिवाजी महाराजांचे विचार आहेत.त्यामुळे तुमच्यासमोर कुणी आले आणि शिवाजी महाराजांना मानतो असे सांगत असेल तर तुम्ही मूर्तीसमोर हात जोडता पण तुम्ही देशाच्या संविधानाला मानता का ?, तुम्ही देशातील संस्थांना वाचवता का? तुम्ही देशात गरिबांचं संरक्षण करता का ? असे सवाल त्यांना करा.जर करत नसाल तर मूर्तीसमोर हात जोडण्याला काही अर्थ नसल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
छ.शिवरायांची ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीतूनच
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा हि आपल्या देशाच्या संविधानात आहे.छ.शिवाजी महाराजांना ही विचारधारा या महाराष्ट्राच्या मातीने दिली आहे.येथील जनतेने दिली आहे.ते तुमच्या रक्तात आहे.आपण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतो,तेव्हा तुमच्या डोळ्यात, चेहऱ्यावर,तुमच्या विचारांत,तुमच्या आयुष्यात दरदिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची विचारधारा दिसते.त्यासाठी तुम्ही लढता असेही राहुल गांधी म्हणाले.
कसबा बावडा येथे आमदार सतेज पाटील,आमदार ऋतुराज पाटील तसेच डि.वाय.पाटील ग्रुपचे संजय पाटील यांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बहूशस्त्रधारी एकमेवाद्वितीय अशा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सकाळी राहुल गांधीं यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार सोहळ्याने करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चलिनाथ, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,खासदार शाहू महाराज छत्रपती, बाळासाहेब थोरात,भाई जगताप,माणिक ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comment: