Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

पदमश्री डॉ.डी.वाय पाटील - निश्चयाचा महामेरू,बहूत जनांसी आधारू...

दादासाहेब आज 90 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.


Posted on :10/21/2024 7:12:26 PM



दिनमान ऑनलाइन डेस्क 
समीर मुजावर
कोल्हापूर / 
निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू...शिक्षण क्षेत्रातील आधुनिक भीष्म पितामह म्हणून आदरणीय पदमश्री डॉ. डी. वाय.पाटील दादा यांना ओळखले जाते. कोल्हापुरात कसबा बावडा येथे चाळीस वर्षांपूर्वी गरज ओळखून व्यावसायिक उच्च शिक्षणाचं इवलेसे रोपटे लावणाऱ्या डी.वाय दादांनी आपल्या महत्वकांक्षेने याच रोपट्याला महाकाय वृक्षात  रूपांतरीत केले.




माजी राज्यपाल महामहिम डॉ.डी. वाय.पाटील अर्थात दादासाहेब यांना आजच्या आधुनिक युगात सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाची दारं सताड उघडून पिढ्या घडवणारे शिक्षणमहर्षी म्हणून जाणलं जातं.कारण सर्वसामान्यांच्या,गोरगरीब कुटुंबातील हजारो लाखो तरुणांना डॉ.डी.वाय.पाटील याच एका नावाने तंत्रज्ञानाचा,वैद्यकीय आणि तत्सम व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले. 


केवळ कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आणि देशात सुद्धा काही ठिकाणी डॉ.डी वाय पाटील यांनी ज्ञानगंगा नेली. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राजकारण, समाजकारण,शिक्षण, क्रीडा,कृषीसारख्या विविध क्षेत्रांत अष्टपैलू डॉ.डी.वाय.पाटील दादांचे कार्य दिशादर्शक आहे. 


व्यावसायिक शिक्षणाची कवाडे उघडून योग्य पध्दतीने प्रशिक्षित केलेल्या हजारो तरुणांमध्ये रोजगार निर्माण करण्याची उर्मी देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.डी.वाय पाटील. म्हणून त्यांना निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू...ही उक्ती समर्पक लागू पडते.


आज डॉ डी.वाय पाटील यांचा जन्म दिवस आहे.त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला.आपल्या वयाची 90 वर्षे पूर्ण करणारे डॉ.डी वाय पाटील यांनी तब्बल 19 व्या वर्षी ऐन तारुण्यात पदार्पण केल्या केल्या  कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटी या नामांकित संस्थेच्या  चेअरमन पदाची धुरा हाती घेतली होती.तर अवघ्या २३ व्या वर्षी कोल्हापूर नगरपालिकेचे ते नगरसेवक बनले. १९६७ साली वयाच्या ३२ व्यावर्षी पन्हाळा-बावडा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार पद भूषवून त्यांनी या मतदार संघाला न्याय देण्यासाठी विधानसभेत आपल्या अभ्यासाचा कस लावला.आमदार असलेल्या डॉ.डी.वाय, दादांचा राज्यातील नेत्यांसह थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत संपर्क असे. त्यामुळेच राजकारणात त्यांनी  दबदबा निर्माण केला होता.


त्या काळात काळम्मावाड़ी धरण व्हावे म्हणून त्यांनी आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले.तर त्या काळात कोल्हापूर च्या जनतेला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांचे मोलाचे योगदान ही आहे.


कसबा बावड्यातील सधन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी.वाय पाटील यांनी आपल्या तारुण्यात पैलवानकी सुद्धा केली.राजकारणात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला.कसबा  बावडा,पूणे,मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांनी शिक्षणसंकुले उभी केली.आणि त्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. 


आजपर्यंत त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी घडले आहेत.  गगनबावड्यासारख्या डोंगराळ आणि दुर्गम भागात विकासापासून वंचित या तालुक्यातील जनतेला दिलेला साखर कारखान्याचा शब्द त्यांनी पाळून दाखवला आणि या तालुक्यात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.


महाराष्ट्र टेलिफोन अॅडव्हायझरी कमिटी, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, शिपिंग कार्पोरेशन  ऑफ इंडिया, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अशा अनेक नामांकित पदांवर त्यांनी काम केले.


शाहूंच्या सांस्कृतिक कोल्हापुरात ६५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  यशस्वी केले. अशा या आदरणीय व्यक्तिमत्त्वाचा देश-विदेशातील अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट बहाल करून गौरव केला.


कोणत्याही कार्यक्रमात बोलायची संधी मिळाली तर डॉ.डी वाय.पाटील दादांची ओघवती वाणी अध्यात्माचे धडे देत श्रोत्यांना आध्यात्मिक जगाचा अनुभव देऊन जाते.असा त्यांचा अध्यात्माचा गाढा अभ्यास आहे.त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केले.केवळ एक रुपया मानधनावर राज्यपाल पद भूषवणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे या दोन्ही राज्यातील जनतेच्या मनावर राज्य करणारं आदर्श व्यक्तिमत्त्व होय. 


डॉ.डी.वाय.पाटील समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान विधानपरिषद आमदार सतेज पाटील  या दोन्ही सुपूत्रांनी डॉ.डी वाय.दादांसाहेबांचा  वारसा समर्थपणे पेलला आहे. तर त्यांचा लाडका नातू ऋतुराज  संजय पाटील या तरुण लोकप्रतिनिधीने सुद्धा आपल्या आजोबांच्या नावलौकिकात भर पडावी असं कार्यकर्तृत्व दाखवून हाच त्यांचा नातू तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
  
डॉ.डी.वाय.दादांच्या अर्धांगीनी सौ.शांतादेवी डी पाटील यांच्या मोलाच्या साथीमूळे डॉ.डी.वाय.पाटील यांच्या कार्याचा डंका चारी दिशांना दुमदुमला आहे.यात तिळमात्र शंकाच नाही.आणि म्हणूनच या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्रिवार शुभेच्छा..




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.