Livve Dinmaan Online
चंद्रकांत मुदुगडे(शाहूवाडी प्रतिनिधी) - नांदारी येथील गावठी दारूचा हातभट्टी अड्डा शाहूवाडी पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईमध्ये प्लास्टिक कॅन, रबरी फुग्यातील तयार गावठी दारू, चार बॅरेल कच्चे रसायन, पाईप व तत्सम उत्पादन साहित्य पोलिसांनी नष्ट केले. याप्रकरणी बबन आनंदा इंगळे (वय ५०, रा. नांदारी, ता. शाहूवाडी) या स्थानिक संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा व साथरोग नियंत्रण कायद्यान्वये पोलिस दप्तरी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदारी (ता. शाहूवाडी) येथील सरकारी जागेतील ओढा परिसरात गावठी दारू निर्मितीची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शाहुवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी निर्भया पथकप्रमुख एपीआय शैलजा पाटील, व अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या हातभट्टीच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी बबन आनंदा इंगळे हा स्थानिक संशयित आरोपी येथील ओढ्याकाठी जळत्या चुलीवर पत्र्याच्या बॅरेलमध्ये कच्चे रसायन उकळून अवैधरित्या गावठी दारू तयार करीत असताना आढळून आला.
याचवेळी परिसरात सापडलेले प्लास्टिक कॅन, रबरी फुग्यातील ३५ लिटर तयार गावठी दारू,चार बॅरेल कच्चे रसायन,दहा किलो काळा गूळ पाईप व दारू उत्पादनातील तत्सम बेकायदेशीर साहित्य पथकातील कर्मचाऱ्यांनी नष्ट करून त्याची विल्हेवाट लावली. सरकारी पंचांसमक्ष अड्डा व संशयिताच्या घरातील झडती व जप्तीची संपूर्ण कारवाई प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शाहूवाडी पोलिस ठाण्यातील गोपनीय कक्षाचे भरतकुमार मोळके, हेड कॉन्स्टेबल शिंदे, हवालदार काशीद, व पवार या पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांसोबत कारवाईत सहभाग घेतला.
Comment: