Livedinmaan.com
कोल्हापूर
“जागतिक रोटरी दिन” तसेच रोटरी इंटरनॅशनल स्थापनेस १२१ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त “रोटरी मूव्हमेंट ऑफ कोल्हापूर” यांच्या वतीने आज सकाळी भव्य मोटारसायकल रॅलीद्वारे "सेवा हीच ओळख, स्वच्छता,आरोग्य व शिक्षण" यांसारखे विविध संदेश देणारी लक्षवेधी प्रबोधन फेरी काढण्यात आली.
दसरा चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून,माजी प्रांतपाल रो.वासुदेव देशिंगकर,रो.प्रताप पुराणिक यांच्या हस्ते आणि मूव्हमेंटचे अध्यक्ष रो.शितल दुग्गे यांच्या उपस्थितीत रोटरी मूव्हमेंटचा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.कोणत्याही घोषणा न देता अत्यंत शिस्तबद्ध रित्या जिल्ह्यातील विविध १४ रोटरी क्लबच्या रोटेरियन तसेच रोटरॅक्ट सदस्यांनी सामाजिक जनजागृतीचे बॅनर,घोषवाक्ये तसेच क्लबचे ध्वज प्रदर्शित करत,शहराच्या प्रमुख मार्गांवरून प्रबोधन फेरी काढत विविध सामाजिक संदेश दिले.
रॅलीचा समारोप रोटरी समाज सेवा केंद्र येथे झाला.यावेळी सध्याचे प्रांतपाल रो.इंजी.अरुण भंडारे यांच्या हस्ते केक कापून १२१ वर्षांचा गौरव सोहळा साजरा करण्यात आला.अशा उपक्रमांमुळे समाजात रोटरीची सकारात्मक प्रतिमा अधिक दृढ होईल व जनतेशी संवाद अधिक बळकट होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरच्या नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी रोटरीच्या विविध सामाजिक प्रकल्पांची माहिती घेतली.शहराचा विकास आणि महिलां - साठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी ही काळाची गरज असल्याने,शहरातील शाळा तसेच महत्त्वाच्या ठिकाणी महिला शौचालय उभारणीसह विविध विकास कामांसाठी रोटरीची मदत घेतली जाईल.तसेच रोटरीच्या सामाजिक कार्यात महानगरपालिका प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.रो.अभिजित पिंपळकर,रो.सचिन माने,रो.विकास राऊत, रो.अभिनंदन वणकुद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रभारी सचिव रो.मोनिका शेवाळे यांनी मानले.
Comment: