समीर मुजावर
कोल्हापूर - कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांची अरेरावी वाहन धारकांना सतावत आहे.वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी विनाकारण वाहन धारकांना अडवून वाहनधारकांसह वाहनांचे मागील आणि पुढील बाजूची छायाचित्रे काढून कारवाई करण्याचा धाक दाखवून चक्क वाहनधारकांना लुटले जात असल्याच्या तक्रारी वाहनधारक करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज मॅनहोलमध्ये क्रेन कारवाईच्या बनावट पावत्या टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रकार एका पत्रकाराने उघडकीस आणला होता.त्यानंतर वरीष्ठ पातळीवर या प्रकरणाची चौकशी झाली.आणि दोषीं आढळलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करून याप्रकरणावर पडदा टाकण्यात आला.काही दिवस वाहतूकीस अडथळे आणण्याच्या अवस्थेत वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या क्रेन सुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
त्यानंतर काही महिने परिस्थिती बदलली आणि सर्व काही व्यवस्थित सुरू झाले.कारवाई झाल्यानंतर रितसर दंडाच्या पावत्या दिल्या गेल्या.आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा विनम्रता आली.
दरम्यानच्या काळात वाहतूक पोलीस निरीक्षकांची परजिल्ह्यात बदली झाली.नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांनी आल्या बरोबर आपला या शाखेचा जुना अनुभव पणाला लावला.शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकडे त्यांचा कल दिसला.मात्र कालांतराने पुन्हा सर्व काही आलबेल झाले.कारवाया करणारे नाके,वाहतूक पोलिसांचे ठरलेले पॉईंट,बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांवर आवर्जून केल्या जाणाऱ्या कारवाया वाढल्या,माल वाहतूक करणाऱ्या टेम्पो,रिक्षा,ट्रक यांच्या एन्टऱ्या वाढल्या आहेत.अशा प्रत्येक वाहनधारकांकडे कारवाई न करण्यासाठी महिन्याच्या रकमा उकळून ठराविक कागदाच्या चिट्ठीवर सांकेतिक सह्या मारून दिल्या जात आहेत.
विनाकारण वाहनधारकांना थांबवून त्यांचे छायाचित्र काढणारे पोलीस या शाखेत वाढू लागले आहेत.याच छायाचित्रांच्या धाकाखाली कारवाई करण्याची भीती दाखवत वरकमाईला सोकावलेले पोलीस आता पुन्हा निर्ढावले आहेत.याचा त्रास सर्वसामान्य वाहन धारकांना सहन करावा लागत आहे.
त्यामुळे अशा वरकमाईला चटावलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर आता वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का असा सवाल या निमित्ताने वाहन धारक विचारू लागले आहेत.
Comment: