Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

“तात्या” साहेबांनी चहापाण्यासाठी पैसे मागितले

म्हणाले माझ्या सहीशिवाय काहीच होणार नाही !!


Posted on :3/1/2018 4:25:16 PM


कोल्हापूर प्रतिनिधी – पाच दिवसापूर्वी कसबा बावडा येथील मराठाकॉलनी मधून एक किमती दुचाकी चोरीला गेली..ज्याची दुचाकी होती तो येथील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतो.दुचाकी चोरीला गेल्याने हा विद्यार्थी थोडा धास्तावला...मित्रांच्या सल्ल्याने त्याने ऑनलाईन तक्रार पोलिसांच्या पोर्टल वर दाखल केली.मन राहवलं नाही म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात  जावून एका दोघांना भेटायचा प्रयत्न केला.कोणी दाद लागू दिली नाही."कच्ची तक्रार" देण्याचा सल्ला तिथल्याच एका पोलिसाने दिला.त्याचवेळी ऑन लाईन तक्रारीवरून एका “तात्या” साहेबांकडे या वाहनाच्या तपासाची केस आली.

बघतो...पाहुया...सापडेल...अशी उत्तरे ऐकून चार पाच दिवस गेले.दरम्यानच्या काळात पोलिसांनी तक्रार आल्यानंतर जे काम तत्परतेने करायला हवे होते..ते या विद्यार्थाने स्वतः सुरु केले.त्याने कोल्हापुरातील कसबा बावड्याच्या मराठा कॉलनी पासून जवळपास असणारी सर्व महत्वाच्या रस्त्यावरची ठिकठीकाणी लावलेली खासगी दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज पाहायला सुरुवात केली.आणि त्याच्या या परिश्रमाला यश आले.मंगळवारपेठ आणि कसबा बावडा येथील एक-दोन चौकातील सीसीटीव्ही मध्ये वाहनाचा चोरटा आढळून आलाच..तिघेजण एका दुचाकीवरून वाहनाचा क्रमांक बदलून राजरोस शहरात फिरतानाचे हे सीसीटीव्ही फुटेज पाहून या विद्यार्थ्यांने अखेर पोलीस मुख्यालयात लावण्यात आलेल्या शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कंट्रोलरूमकडे धाव घेतली. त्याठिकाणी एका इमानदार पोलिसाने या मुलाची मनापासून मदत केली आणि अखेर वाहन चोरटा सापडला.पोलिसांनी या चोरट्याकडून एक नव्हे तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.

 यानंतर ज्याचे दुचाकी वाहन चोरीला गेले होते त्या अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्याने संबधित केसचा तपास करणाऱ्या “तात्या” साहेबांना गाठले आणि गाडी त्याच्या ताब्यात मिळण्याची पुढील प्रोसेस विचारली.तर ”तात्या”साहेबांनी कहरच केला.त्यांनी न्यायालयीन प्रोसेस सांगण्याऐवजी,स्वतःचे वाहन स्वतः शोधून काढणाऱ्या त्या मुलाला चक्क 'माझ्या सहीशिवाय तुझ्या ताब्यात गाडी द्यायला येत नाही तेव्हा माझ्या चहा पाण्यासाठी पैशाची व्यवस्था कर म्हणून सांगून टाकले'. या मागणीने हा मुलगा चक्रावला...त्याला काहीच सुचेना...अखेर एका पत्रकाराला भेटून त्याने घडला प्रकार सांगितला.पत्रकाराने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आणि या भ्रष्टाचारी पोलिसाचा भांडा फोडण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या कानावर हा प्रकार घातला..त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी कोणालाही पैसे देवू नका असे सुनावले आणि फोन ठेवून दिला...आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस खात्यातील ही घाण घालवायची असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्याचा सल्ला दिला...!!

कोल्हापुरात काही पोलीस ठाण्यात अशा पद्धतीने तक्रार घेऊन आलेल्यांना हा अनुभव येतोच येतो.पैसे दिल्याशिवाय कोणतेच प्रकरण मिटत नाही.एखाद्या वादाची घटना घडल्यास परिसरातील दादालोक आणि पोलिसांचे हुजरे आपल्या लोकांना अटक करू नये म्हणून सर्रास पैसे देवून आपले ईप्सित साध्य याबाबत करून घेतात.आणि सर्वसामान्य मात्र हेलपाटे घालून मेटाकुटीला येतात.पारपत्राबाबतच्या पोलीस चौकशीसाठी आलेल्यांना गोपनीय विभागातील पोलीस कर्मचारी 500 ते 1000 रुपये घेतल्याशिवाय सकारात्मक रिपोर्ट देत नाहीत अशा तक्रारी पारपत्रकामी पोलीस चौकशीसाठी जावून हैराण झालेले नागरिक करू लागले आहेत.

एवढेच नव्हे तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याच्या कारणावरून काही पोलीस ठाण्यांना नुकत्याच नोटीसा सुद्धा देण्यात आल्या आहेत.मटका,जुगार,दादागिरी,वेश्याव्यवसाय आणि अनेक अवैध धंद्यांना पोलिसांकडून मोठ्या रकमा उकळून अभय दिले जात असल्याने कोल्हापुरात 'क्राईम रेट' वाढू लागलाय.आता याला रोखण्यासाठी इमानदार वरिष्ठ अधिकारी मिळायला हवेत हे मात्र नक्की अशी चर्चा कोल्हापुरावासीय करू लागले आहेत.




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.