कोल्हापूर प्रतिनिधी -करवीर पोलीस ठाण्यातील वरकमाईला चटावलेल्या रंगराव मनुगडे या हवालदाराला आज एका वादग्रस्त प्रकरणात अटक न करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.आपण फसलो असल्याचे जाणवल्यानंतर रंगरावच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.ही कारवाई सुर्वेनगर,प्रथमेशनगर येथील एका किराणा मालाच्या दुकानाजवळ झाली.
त्याचे झाले असे...करवीर पोलिसात प्लॉटच्या वादातून एक गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्यातील संशयितांना अटक करायची नसेल तर आपणास पाच हजार रूपये द्यावे लागतील असे या गुन्ह्याचा तपास करणारा हवालदार रंगराव भागोजी मनुगडे याने संबंधितास सांगितले.परंतू आपण लाच द्यायची नाही असा निर्धार केलेल्या तक्रारदार आनंद चंद्रकांत गायकवाड यांनी तात्काळ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
आनंद गायकवाड यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचे सासरे दस्तगीर हसन शेख हे आपटेनगर येथे वास्तव्यास आहेत. शेख यांच्या घराशेजारी राहणाऱ्या शिवाजी सुतार याच्याबरोबर किरकोळ वाद झाला होता. या वादातून सुतार यांनी शेख यांचा जावई आनंद गायकवाड व त्यांच्या पत्नीसह 8 जणांवर करवीर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देऊन गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रंगराव मनुगडे यांचाकडे सोपवण्यात आला.
मात्र वरकमाईला चटावलेल्या मनुगडे याने गायकवाड यांच्याकडेच या गुन्हयात अटक करायची नसेल तर प्रत्येकी 5 हजार रुपयांची लाच द्यावी लागेल अशी मागणी केली होती..
गायकवाड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत तक्रार दिल्यानंतर विभागाचे उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी दोन साक्षीदारांना पाठवून देवून याबाबत खात्री करून घेतली. मनुगडे याने सर्वप्रथम 10 हजार रुपयांची मागणी केली होती.मात्र त्यावर तडजोड करून 5 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. मनुगडे यांनी पैसे घेवून गायकवाड यांना सुर्वेनगर येथे एका किराणा मालाच्या दुकानाजवळ बोलवून घेतले. याठिकाणी आधीच सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लाचखोर मनुगडे यास 5 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून मनुगडे याच्यावर करवीर पोलिसातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comment: