Breaking News:

www.livedinmaan.com

शेअर करा :

शिरोलीतील स्मॅक संस्थेकडून एमआयडीसीच्या जागेचा गैरवापर करून लाखोंची कमाई !!


Posted on :7/3/2020 8:36:07 PM



Livve Dinmaan online
कोल्हापूर (शिरोली वार्ताहर) - शिरोली औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जागेचा स्मॅक  संस्थेने बेकायदेशीर वापर करून या जागेवर फौंड्रीतील  काळी वाळू टाकणाऱ्या कडून लाखो रुपये गोळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हीच काळी वाळू पुन्हा परस्पर विक्री करुन कोट्यावधी त्याची कमाई स्मॅक करीत असल्याचेही समजते. 




शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मूळच्या टोप आणि शिये गावच्या हद्दीतील काही रिकामी जागा वन खात्याच्या अखत्यारीत होती. ती सध्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी घनदाट झाडी होती. ही जागा शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर म्हणजे स्मॅक या  संस्थेने फौंड्रीतील वापरलेली काळी वाळू टाकण्यासाठी महामंडळाकडे मागितली होती. पण ती देण्यास महामंडळाने स्पष्ट नकार दिला. तरीही या जागेवरील झाडे तोडून या जागेत फौंड्री उद्योजकांनी  काळी वाळू टाकण्यात सुरुवात केली.ठेकेदारामार्फत याठिकाणी वाळू टाकण्यास सुरुवात केली तर या जागेत ही वाळू टाकल्याबद्दल प्रत्येक ट्रॉलीसाठी शंभर रुपये स्मॅकच्यावतीने आकारण्यास सुरुवात केली.आणि  स्मॅकच्या नावाने रीतसर पावत्याही दिल्या जात आहे. गेली पाच-सहा वर्षे हा प्रकार सुरू असून दररोज 50 ते 100 ट्रॉली वाळू याठिकाणी पडते. या जागेत काळ्या वाळूचा  प्रचंड मोठा डोंगर तयार झाला आहे. त्यामुळे प्रदुषणाचाही  प्रश्न निर्माण झाला आहे. 


शासनाच्या जागेचा गैरवापर करून लाखो रुपये संस्था बेकायदेशीर कमावत असताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासह  शासकीय यंत्रणेने मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. याबाबत  स्मॅकच्या कर्मचाऱ्यांनी माध्यमांना  माहिती दिल्या नंतर याची दखल घेऊन हातकणंगले तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी हेरले मंडलाधिकारी भरत जाधव यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणेच जाधव या ठिकाणी आले असता ती जागा टोप आणि शिये गावच्या हद्दीतील पण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हेरले मंडलाधिकारी जाधव हे पेठ वडगाव मंडलाधिकारी आणि शिये तलाठी यांना माहिती देऊन निघून गेले. 


महसूल आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि गोंधळाची स्थिती याचा फायदा स्मॅक संस्था घेऊन लाखोंची कमाई करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता संबंधित यंत्रणा काय भूमिका घेणार आणि इतके दिवस बेकायदेशीरपणे जागा वापरून केलेल्या कमाई बद्दल  काय कारवाई करणार ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


व्हिडीओपाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻




Comment:


आपल्या आजूबाजूला बातमीयोग्य घटना अथवा कोणत्याही अनुचित घटना आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ त्याचे मोबाईलवर छायाचित्रे काढा,चित्रफीत बनवा आणि माहितीसह खालील व्हाट्सअप क्रमांकावर किंवा ईमेलवर शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हा सिटीझन रिपोर्टर.