कोल्हापूर ( समीर मुजावर ) – संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा आधारवड असणारा थोरला दवाखाना म्हणजे
सीपीआर रुग्णालय..जिल्ह्यात झालेल्या छोट्यामोठ्या अपघातातील जखमींना तात्काळ उपचार
करण्यासाठी दाखल करण्याचे हे एकमेव ठिकाण..परंतु याच दवाखान्यातील अपघात विभाग अक्षरशः
रुग्णाच्या जीवाशी खेळ करत असल्याचा अनुभव सर्वसामान्यांना येत आहे.निवासी डॉक्टर या
विभागाकडे फिरकत नाहीत.मानसेवी डॉक्टर एखादी चक्कर टाकण्यापलीकडे काहीच करत नाहीत.

त्यामुळे
अपघातातील गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर या विभागातील नर्सेस आणि वॉर्डबॉय यांच्यामार्फतच
उपचार केले जात असल्याचे वास्तव चित्र आहे.पण या नर्सेस आणि वॉर्डबॉय कडून रुग्णांच्या
दुखापतीचे गांभीर्य लक्षात न घेता केल्या जाणाऱ्या उपचारात तत्परतेचा अभाव असल्याने
ही दिरंगाईचे उपचार म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.अशा परिस्थितीत
डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या या निष्क्रीयते व मानसिकतेमुळे तयार झालेल्या बजबजपुरीने
या सरकारी रुग्णालयाचे प्रमुख असलेले डीन अर्थात अधिष्ठाता सुद्धा हतबल झाले आहेत.
कोल्हापूर
जिल्ह्यात आणि परिसरात कोठेही अपघात झाला तर या अपघातातील जखमींना त्वरित उपचारासाठी
दाखल करण्याचे सीपीआर हे प्रमुख रुग्णालय आहे.या रुग्णालयातील अपघात विभागात जखमींना
दाखल केल्यानंतर योग्य डॉक्टरच्या मार्फत तात्काळ उपचार व्हावेत ही सर्वसामान्य
लोकांची अपेक्षा असते.पण या सरकारी रुग्णालयातील अपघात विभाग मात्र सगळीच बजबजपुरी
झाली आहे.याठिकाणी कायम स्वरूपी डॉक्टर हजर नसतात.नर्सेस आणि वॉर्डबॉय यांचे
प्रमाण अत्यल्प असते पण शिकावू डॉक्टर आणि नर्सेस यांची मात्र या विभागात
कामाशिवाय मिरवणे जास्त दिसते.

अचानक दाखल झालेल्या जखमींवर उपचार करण्याची तत्परता
कधीच दाखवली जात नाही ड्युटीवर असणारे डॉक्टर्स कधीच येथे जागेवर दिसत नाहीत.मानसेवी
डॉक्टर मान वळवूनही या विभागाकडे पहात नाहीत.त्यामुळे नर्सेस आणि वॉर्डबॉय आपल्या
मूड प्रमाणे आणि जमेल तसे उपचार करतात.तो ही अगदी जुजबी आणि रुग्णांसाठी अतिशय
वेदना देणारा असा असतो.रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत विचारणा केली तर अथवा
तक्रारीचा सूर दाखवला तर या विशेष करून महिला कर्मचाऱ्यांकडून रुग्ण आणि त्यांच्या
नातेवाईकांना उद्धटपणाने उत्तरे देवून रुग्णाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार
केला जातो.

याबाबत वरिष्ठ म्हणून अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार केली, व त्यांनी त्या
तक्रारीची दखल घेऊन सूचना केल्या तर त्याकडे अतिशय उर्मटपणे दुर्लक्ष केले जात
आहे.याबाबत अधिष्ठाता यांनी काही कारवाई केलीच तर संघटना किंवा राजकीय दबाव याचा
वापर करून कारवाई टाळण्याचा उद्योग केला जातो.यामुळे अतिशय संवेदनशील असणारा हा
अपघात विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत आहे.तर याबाबत
रुग्णालयाचे अधिष्ठाताही हतबल झाले आहेत.

अशी ही बजबजपुरी
याचा अनुभव
साक्षात एका महिला पत्रकाराचा दुचाकीवरून घसरून पडल्याने झालेल्या अपघातानंतर आला.तिला
या अपघात विभागात दुपारी साडेबारा वाजता डोक्याला मार लागल्याने उपचारासाठी दाखल
केले होते.मात्र सीपीआर मधील अपघात विभागात स्ट्रेचरवरच तब्बल तीन तास कोणतेही
उपचार न करता ताटकळत ठेवण्यात आले.काही सहकारी पत्रकारांनी याबाबत अधिष्ठाता
डॉ.रामानंद,आमदार राजेश क्षीरसागर,पालक मंत्र्यांचे स्वीय सहायक व वैद्यकीय समितीचे सदस्य विजय जाधव,तसेच अन्य
काहीना संपर्क साधून घडलेली परिस्थिती कथन केल्यानंतर या पत्रकार महिलेची जुजबी तपासणी
करून तिच्या डोक्याचे सिटीस्कॅन आणि एक्सरे करण्यासाठी पाठवले.मात्र हा विभागाच
बंद असल्याने सुमारे तासभर या रुग्णाला स्ट्रेचरवरच झोपून या कुलूप बंद विभागाच्या
बाहेर ताटकळत ठेवले.
याबाबत सुद्धा अधिष्ठाता डॉ.रामानंद यांना कळवल्यानंतर अवघ्या
पाच मिनिटात ते स्वतः त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी संबधित विभागाच्या डॉक्टरला
बोलावून धारेवर धरले.त्यानंतर या विभागाचे कुलूप काढून रुग्णाचे सिटीस्कॅन आणि
एक्सरे करण्याची प्रक्रिया सुरु केली.
Comment: